Share Market Today Update: शेअर बाजारातील कधी कोणत्या स्टॉकमुळे गुंतवणूकदारांच्या खिशात खळखळाट होईल आणि कधी कोणत्या शेअरमुळे खिसा कापला जाईल कोणीच खात्रीने सांगू शकत नाही. आता बाजारात लिस्ट झाल्यावर 157 रुपयांवर झेप घेतलेल्या ओला इलेक्ट्रिक शेअरची किंमत 84 टक्के घसरून आता 30 रुपयांच्या खाली आपटली आहे.
EV कंपनीचा शेअर धडाम
भारतीय बाजारातील दुचाकी इलेक्ट्रिक वाहन निर्माता कंपनी ओला इलेक्ट्रिक मोबिलिटीच्या शेअर्समध्ये गेल्या काही दिवसांपासून सतत विक्रीचा सपाटा चालू आहे. परिस्थिती अशी आहे की शेअरची किंमत आयपीओ किमतीवरून 84% कमी झाली आणि 25 रुपयांवर जमिनीवर आपटली आहे. 2024 मध्ये ओला इलेक्ट्रिक मोबिलिटीची लिस्टिंग झाली होती आणि कंपनीची इश्यू किंमत 76 रुपये होती. पण, अलीकडच्या काळातील शेअर्सवरील दबावामुळे गुंतवणूकदारांना 57000 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत आता प्रश्न असा आहे की कंपनीचे शेअर्स कमी किमतीत खरेदी करायचे की नाही?
ओला शेअरमधील घसरणीच्या वेगाने गुंतवणूकदारांना चकित केले असून लिस्टिंगच्या तब्बल दोन वर्षही पूर्ण झाले नाही आणि शेअर इश्यू किमतीपेक्षा जवळजवळ 70% खाली गरंगळला आहे. यावरून बाजारातील भावना किती लवकर बदलू शकतात हे लक्षात घ्या. शुक्रवारी, आठवड्याच्या शेवटच्या व्यापार दिवशी, ओला इलेक्ट्रिक मोबिलिटीचे शेअर्स 0.16% घसरून 25.13 रुपयांवर व्यवहार करत आहेत.
ब्रोकरेजने घटवले रेटिंग
इकॉनॉमिक टाइम्सच्या अहवालानुसार जागतिक ब्रोकरेज गोल्डमन सॅक्सने ओला शेअरची लक्ष्य किंमत 52 रुपयांवरून 26 पर्यंत कमी केली, जी शुक्रवारच्या ट्रेडिंगच्या वेळीच स्टॉकने ओलांडली आहे. याशिवाय रेटिंग ‘न्यूट्रल’ असे कमी करण्यात आले असूनकंपनीच्या महसुलात घट ब्रोकरेजला अपेक्षित आहे. तसेच व्यवसाय सुधारण्यासाठी ब्रोकरेजने मजबूत सेवा ऑपरेशन्स आणि उच्च-स्तरीय अधिकाऱ्यांच्या सातत्यतेवर लक्ष केंद्रित करण्याची शिफारस केली आहे.
ओला शेअरमध्ये अजूनही घसरण होणार का?
ओलाला केवळ वाढती स्पर्धा किंवा मंदावलेल्या मागणीच्या दबावाचा सामना करावा लागत नाही तर, कंपनीसमोर नियामक नियमांशी संबंधित आव्हाने आहेत. याआधी काही शोरूम आणि सेवा केंद्रे वैध व्यापार प्रमाणपत्रांशिवाय कार्यरत असल्याचे आढळून आले होते, ज्यामुळे सरकारी कारवाई झाली होती. त्यामुळे गुंतवणूकदारांसमोरील मोठा प्रश्न म्हणजे की इतक्या मोठ्या घसरणीनंतर ही घसरण दीर्घकालीन संधी बनू शकते का? की जोखीम अजूनही जास्त आहे आणि आणखी घसरण होण्याची शक्यता आहे?
(Disclaimer : वरील लेखात कोणताही गुंतवणूक सल्ला दिलेला नाही. शेअर बाजारातील गुंतवणूक जोखमीच्या अधीन असते, म्हणून कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी सावधगिरी बाळगा. वरील मते वैयक्तिक आहेत. महाराष्ट्र टाइम्स या आधारावर स्टॉक खरेदी किंवा विक्री सल्ला देत नाही.)
2026-02-27T11:02:02Z