Iran Attack Latest Update: अमेरिका आणि इस्रायलने संयुक्तपणे लष्करी कारवाईत इराणमध्ये कहर केला. शनिवारी सकाळपासूनच इस्रायली क्षेपणास्त्रे इराणवर डागली जात असून जगातील महासत्ता आणि ‘हट्टी कट्टरपंथी नेता’ असल्याने तिसऱ्या महायुद्धाचा धोका निर्माण झाला होता आणि त्यात आता अमेरिकेने इराणवर हल्ला करून मध्यपूर्वेत एक नवीन युद्ध सुरू केले आहे.
इराणवरील हल्ल्यामागचा अमेरिकेचा ‘छुपा’ प्लॅन
इस्रायलला इराणला अणुबॉम्ब विकसित करण्यापासून रोखायचे आहे आणि अमेरिकेला प्रदेशावर नियंत्रण हवं आहे. इराणवर नियंत्रण म्हणजे मध्य पूर्वेवर वर्चस्व. इराणकडे 208,600,000,000 बॅरल कच्च्या तेलाचा साठा असून इराण जागतिक तेल उत्पादनात 11.45% योगदान देतो. पण फक्त तेलच नाही तर, इराण नैसर्गिक वायूचा सर्वात मोठा उत्पादक देश आहे आणि दरवर्षी 276 अब्ज घनमीटर गॅसचे उत्पादन करतो. अमेरिकेचा यावरच डोळा आहे.
चीनविरुद्ध अमेरिकेची मध्यपूर्वेत मोर्जेबांधणी
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष इराणवर दबाव आणत असून या खेळाच्या केंद्रस्थानी कच्चे तेल आहे, ज्याद्वारे चीनसमोर शक्तिप्रदर्शन केले जात आहे. याआधी अमेरिकेने वर्षाच्या सुरुवातीलाच व्हेनेझुएलाचे तेल साठे ताब्यात घेतले होते, तर इराणकडे जगातील तिसरा मोठा तेल साठा - अंदाजे 209 अब्ज बॅरल - आहे.
अमेरिकेच्या अनेक निर्बंधांनंतरही चीन इराणचा सर्वात मोठा तेल खरेदीदार राहिला असून चीन इराणच्या एकूण कच्च्या तेल निर्यातीपैकी सुमारे 80%, दररोज 10 लाख बॅरलपेक्षा जास्त आयात करतो. निर्बंधांच्या काळात चीन लहान रिफायनर्स आणि तृतीय-पक्ष व्यापाऱ्यांसह विविध माध्यमांद्वारे इराणी तेल खरेदी करतो.
अमेरिकेची रणनीती काय
अशा परिस्थितीत, अमेरिकेने इराणवर वर्चस्व मिळवल्यास चीनवरील संकट गडद होऊ शकतं. आधीच युद्धामुळे होर्मुझची सामुद्रधुनी बंद झाल्यामुळे चीन दबावात आला आहे, कारण जगातील सुमारे एक पंचमांश तेल पुरवठा याच मार्गाने जातो. इराणपूर्वी अमेरिकेने व्हेनेझुएलावर हल्ला केला, ज्यामुळे चीनचेही थेट नुकसान झाले. अमेरिकेची ऊर्जा एजन्सी यूएस एनर्जी इन्फॉर्मेशन ॲडमिनिस्ट्रेशनच्या माहितीनुसार व्हेनेझुएलाकडे जगातील सर्वात मोठा तेलाचा साठा - 303 अब्ज बॅरल - आहे.
व्हेनेझुएलाचे तेल नियंत्रित करताना ट्रम्प यांनी अमेरिका बाजार भावाने विकायचे जाहीर केलेले. म्हणजे सवलतीत तेल खरेदी करणाऱ्यांना, विशेषतः चीनवर सर्वाधिक प्रभाव पडू शकतो. 2020 ते 2023 दरम्यान चीनने व्हेनेझुएलाकडून बाजारभावाच्या तुलनेत सरासरी 20-25% सवलतीने कच्चे तेल खरेदी केले होते.
2026-03-02T10:47:02Z