तात्काळ थांबवा...! AI वर ट्रम्प यांची वक्रदृष्टी, अमेरिकेत अँथ्रोपिकवर बंदी; तंत्रज्ञानाच्या शर्यतीत OPENAIची सरशी

Anthropic AI Ban: अमेरिकन AI कंपनी अँथ्रोपिकने अमेरिकेच्या युद्ध विभागासमोर झुकण्यास नकार दिला आणि आता त्यांना त्याची किंमत मोजावी लागणार आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारीसर्व संघीय विभागांना अँथ्रोपिकच्या तंत्रज्ञानाचा वापर थांबवण्याचे आदेश दिले असून कंपनीच्या आर्टिफिशियल इंटेलिजेंस (एआय) सुरक्षा मानकांवर पेंटागॉनशी झालेल्या संघर्षानंतर राष्ट्राध्यक्षांनी कठोर पाऊल उचललं आहे.

ट्रुथ सोशलवर पोस्टमध्ये ट्रम्प म्हणाले, “मी युनायटेड स्टेट्स सरकारच्या प्रत्येक संघीय एजन्सीला अँथ्रोपिकच्या तंत्रज्ञानाचा वापर तात्काळ थांबवण्याचे निर्देश देत आहे. आम्हाला त्याची गरज नाही, आम्हाला नको आहे आणि आम्ही पुन्हा कधीही त्यांच्यासोबत व्यवसाय करणार नाही!” शुक्रवारी, ट्रम्प प्रशासनाने सर्व अमेरिकन एजन्सींना अँथ्रोपिकच्या एआय तंत्रज्ञानाचा वापर थांबवण्याचे आदेश दिले आणि इतर कठोर पावले उचलली, ज्यामुळे सरकार आणि कंपनीमध्ये एआय सुरक्षेवरून सुरू असलेला वाद आणखी वाढला.

ट्रम्प यांनी अँथ्रोपिकवर बंदी का घातली?

पेंटागॉन आणि अँथ्रोपिक यांच्यात AI सुरक्षा मानकांबाबत सुरू असलेल्या वादामुळे ट्रम्प प्रशासनाने हा निर्णय घेतला असून ट्रम्प यांनी राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा म्हणून प्रकरण उचलून धरलं. अँथ्रोपिकवर हल्ला चढवत ट्रम्प म्हणाले की “कट्टरपंथी लेफ्ट आणि जागृत कंपनीला” लष्करी निर्णय घेऊ देणार नाही. दरम्यान, आणखी एक अमेरिकन एआय कंपनी, ओपनएआयची चांदी झाली. अँथ्रोपिकवर बंदी घालण्यात आल्यानंतर काही तासांतच ओपनएआयने अमेरिकेच्या युद्ध विभागाशी करार केला आणि लष्करी नेटवर्कमध्ये एआय मॉडेल तैनात करण्यास सहमती दर्शविली.

अमेरिकन सैन्य आणि अँथ्रोपिक यांच्यातील वाद काय?

हा संपूर्ण वाद अँथ्रोपिकच्या टेक्नोलॉजीभोवती आहे. पेंटागॉनला मोठ्या प्रमाणात देखरेख आणि मानवी हस्तक्षेपाशिवाय हल्ला करू शकतील अशा शस्त्रांचा विकास असे कंपनीची एआयवरील काही सुरक्षा नियम शिथिल करावेत अशी कंपनीकडे मागणी होती जेणेकरून अमेरिकन सैन्य अधिक मुक्तपणे वापर करू शकेल.

मात्र, अँथ्रोपिकचे सीईओ डारियो अमोदेई यांनी स्पष्टपणे नकार दिला आणि सांगितले की एआय अद्याप मानवी देखरेखीशिवाय हल्ला करण्यासाठी किंवा लक्ष्य ओळखण्यासाठी वापरण्यासाठी पुरेसे विश्वसनीय नाही. तसेच असे केल्यास चुकीचे निर्णय होऊ शकतात आणि सैनिकांचे जीवन देखील धोक्यात येऊ शकते असा युक्तिवादही त्यांनी केला.

त्याचवेळी, तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणात देखरेख करण्यासाठी किंवा पूर्णपणे स्वायत्त शस्त्रे विकसित करण्यासाठी केला जाऊ नये असेही कंपनीने आपल्या बाजूने म्हटले. संरक्षण मंत्री पीट हेगसेथ यांनी त्यांना थेट इशारा देखील दिला होता, पण अँथ्रोपिकने झुकण्यास नकार दिला.

2026-02-28T08:02:00Z