Stock Market Today Sensex Nifty Updates 2 March 2026: भारतीय शेअर मार्केट गेल्या दोन दिवसांपासून बंद होता आणि या काळात मिडल ईस्टमध्ये इराण, इस्रायल, अमेरिका आणि संपूर्ण मध्य पूर्वेत गोंधळ उडाला. मध्यपूर्वेत अमेरिका-इस्रायलने इराणवर आक्रमक कारवाई केल्यानंतर सोमवारी, आठवड्याच्या पहिल्याच ट्रेडिंग दिवशी, 2 मार्च रोजी भारतीय शेअर बाजारात सुरुवातीच्या काही मिनिटांत जोरदार घसरण पाहायला मिळत आहे.
इराणमधील वाढत्या संकटामुळे जगभरातील शेअर बाजारांमध्ये घसरण झाली, ज्याचे पडसाद देशांतर्गत शेअर बाजारावरही दिसून आले. मुंबई शेअर बाजाराला अमेरिका-इस्रायल आणि इराणच्या संघर्षाचा धक्का बसताना दिसत आहे. गेल्या आठवड्यात शुक्रवारी, सेन्सेक्स 81287 वर क्लोज झालेला तर, सोमवारी ओपनिंगच्या काही मिनिटांत बीएसई सेन्सेक्स प्री-ओपनमध्ये 6800 अंकांनी घसरला.
त्याचवेळी, देशांतर्गत बाजाराच्या सुरुवातीला सकाळी 9:16 वाजता निफ्टी50 निर्देशांक 313 अंक किंवा 1.24% घसरून 24,866 वर व्यवहार करत होता, तर बीएसई सेन्सेक्स 1061 अंकांनी घसरून 80,226.63 वर खाली आला.
इराणमधील संघर्षाचे भारतीय बाजारात पडसाद
मध्य पूर्वेतील वाढत्या तणाव आणि जागतिक बाजारातील अशांततेमुळे सोमवारी सुरुवातीच्या व्यापारात निफ्टी50 आणि बीएसई सेन्सेक्स कोसळले, तर या युद्धजन्य परिस्थितीचा कच्च्या तेलाच्या किमतींवर परिणाम झाला. अमेरिका आणि इस्रायलच्या संयुक्त हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेईच्या मृत्यू झाल्याची पुष्टी करण्यात आली. त्यानंतर होर्मुजची सामुद्रधुनी बंद करायचेही वृत्त समोर आले ज्यामुळे कच्च्या तेलाच्या किंमती झपाट्याने वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर सोमवारी भारतीय शेअर बाजारात अनेक क्षेत्रांतील शेअर्समध्ये दबाव दिसून आला.
मध्य पूर्वेतील अमेरिका, इस्रायल आणि इराणमधील तणाव वाढल्याने गुंतवणूकदारांमध्ये चिंता निर्माण झाली असून सोमवारी कच्च्या तेलाच्या किमती 12% वाढल्या, ज्यामुळे जगभरातील बाजारांमध्ये जोखीममुक्त वातावरण निर्माण झाले आहे. इराणचे संकट आणखी गडद होत चालले आहे. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या निधनानंतर इराणने आखाती देशांमधील अमेरिकेच्या तळांवर हल्ला केला आणि सर्वात व्यस्त समुद्री मार्ग, होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होणारी वाहतूक देखील रोखली, ज्यामुळे भारताच्या समस्या वाढू शकतात.
युद्धजन्य परिस्थितीत गुंतवणूकदारांनी काय करायचं?
तेल विपणन कंपन्या, रंग, टायर, विमान वाहतूक आणि रसायने यासारख्या कच्च्या तेलाच्या किमतींबद्दल संवेदनशील क्षेत्रांना वाढत्या इनपुट खर्चामुळे नफ्यावर दबाव वाढण्याचा विश्लेषकांनी इशारा दिला. याउलट, ओएनजीसी आणि ऑइल इंडियासह अपस्ट्रीम तेल उत्पादकांना सुधारित उत्पन्नातून फायदा होऊ शकतो, तर एचएएल आणि बीईएल सारख्या संरक्षण कंपन्यांच्या शेअर्समध्ये सकारात्मक भावना दिसून शकतात. मध्यपूर्व आशियातील युद्धाशी संबंधित अनिश्चितता नजीकच्या काळात बाजारावर मोठी प्रभाव पाडू शकते. क्रूड तेलाच्या वाढीमुळे उद्भवणारा ऊर्जा धोका बाजाराच्या दृष्टिकोनातून सर्वात मोठा घटक असेल.