कामावर येऊ नका... AI ने हिरावली कर्मचाऱ्यांची रोजीरोटी, दिग्गज अमेरिकन कंपनीच्या 4000 कुटुंबांवर आभाळ कोसळलं

Fintech Firm Block Layoffs : कृत्रिम बुद्धिमत्ता किंवा AI आता हळूहळू लोकांच्या नोकऱ्या खाणारा राक्षस बनत चालला आहे. ट्विटरचे माजी सीईओ जॅक डोर्सी यांची फिनटेक कंपनी, ब्लॉक इंक देखील एआयमुळे आपल्या कर्मचाऱ्यांना नारळ देणाऱ्या छोट्या-बड्या कंपन्यांपैकी बनली आहे. ब्लॉक इंक, ज्याला पूर्वी स्क्वेअर म्हणून ओळखले जात होते, ने सुमारे 4000 कर्मचाऱ्यांना घरी बसवण्याचा निर्णय घेतला आहे.

एआय खाऊ लागलाय लोकांच्या नोकऱ्या

कंपनीने म्हटले की भविष्यात कामाचं विश्व पूर्णपणे बदलणार आहे. एआयचा वापर अनेक प्रक्रिया जलद, स्वस्त आणि अधिक प्रगत बनवेल परिणामी, कमी कर्मचाऱ्यांसह अधिक काम शक्य होऊ शकेल. कर्मचाऱ्यांसाठी हा निर्णय निश्चितच कठीण आहे, पण कंपनी याकडे भविष्याची तयारी म्हणून पाहत आहे.

तंत्रज्ञान उद्योगात, एआय आता केवळ एक आधार साधन राहिलेले नाही, तर धोरणाचा एक महत्त्वाचा भाग बनत आहे. खरं तर, ही केवळ नोकरी गमावल्याची बातमी नाही. ही बदलत्या युगाची कहाणी आहे, जिथे एआय हळूहळू कंपन्यांच्या कामाच्या पद्धतीत बदल करत आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एका पोस्टमध्ये, डोर्सी म्हणाले की त्यांनी ‘आमच्या कंपनीच्या इतिहासातील सर्वात कठीण निर्णयांपैकी एक’ घेतला आहे. त्यांनी असेही म्हटले की हा निर्णय घेत नाहीत कारण ते अडचणीत आहेत.

भविष्यात कामगार उत्पादकतेचा चेहरा पूर्णपणे बदलणार आहे आणि यामध्ये एआय मध्यवर्ती भूमिका बजावेल असे कंपनीचे म्हणणे आहे. जॅक डोर्सी पुढे म्हणतात की पाऊल भविष्यातील आव्हानांसाठी कंपनीला तयार करण्यासाठी आणि अधिक ‘चपळ’ बनवण्यासाठी एक धोरणात्मक गुंतवणूक असून टाळेबंदीच्या घोषणेनंतर ब्लॉकचे शेअर्सनी आफ्टर-मार्केट ट्रेडिंगमध्ये 27% उसळी घेतली.

आयटी क्षेत्रासाठी धोक्याची घंटा?

तंत्रज्ञान किंवा आयटी उद्योग अद्याप स्थिरावलेला नाही. 2024 आणि 2025 मध्ये मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपातीनंतर ब्लॉकसारख्या कंपन्या 2026 पासून एम्प्लॉईजना नारळ देत आहे. अशा स्थितीत, आता कंपन्या केवळ वाढीवर नाही, तर नफा आणि कार्यक्षमतेवर लक्ष केंद्रित करेल हे स्पष्ट आहे.

जॅक डोर्सी नेहमीच नाविन्यपूर्ण आणि धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी ओळखले जातात व ब्लॉकमधील या अलीकडच्या हालचाली भविष्यात, तंत्रज्ञान कंपन्या कमी लोकांसह अधिक काम करण्यासाठी एआय आणि ऑटोमेशनचा वापरण्याचा प्रयत्न करेल असंच दर्शवतं.

2026-02-27T05:32:02Z